
हिंदू-मुस्लिमांमधील एकतेची भावना दाखवणारी घटना हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर घडली आहे. येथे पाकिस्तानी महिलेने एका मुलीला जन्म दिला. पाकिस्तानची मुलगी पण आई वडिलांनी हिंदुस्थानी नाव ठेवल्याने सध्या तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. गुरुवारी सिंधमधील 159 हिंदू स्थलांतरितांचा एक गट वाघा-अटारी सीमेवरून हिंदुस्थानात पोहोचला. ज्यामध्ये माया नावाची गर्भवती महिला देखील होती. हिंदुस्थानात इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान तिला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे महिलेच्या नवऱ्याने ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर सीमेवर उपस्थित असलेल्या हिंदुस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिला अटारी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. काही तासांच्या उपचारानंतर महिलेने मुलीला जन्म दिला.
दरम्यान, मुलीचा जन्म हिंदुस्थानच्या भूमीवर झाला असल्यामुळे तिच्या पालकांनी तिचे नाव ‘भारती’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीच्या वडिलांनी आपली भावना व्यक्त केली. आम्ही पाकिस्तानातील सिंध प्रांतातून कुटुंबासह हिंदुस्थानात आलो आहोत. आणि हिंदुस्थानच्या भूमिवर माझ्या मुलीचा जन्म झाला. आमच्या घरात सगळेच या बातमीमुळे खूश आहेत. मुलीचे नाव भारती ठेवल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला, असे ते म्हणाले.