पाकिस्तानच्या 22 वर्षीय सलामीवीर सईम अयुबने दुसऱया एकदिवसीय सामन्यात 53 चेंडूंत झंझावाती शतक ठोकताना झिम्बाब्वेचा दहा विकेट्सनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पदार्पणवीर अबरार अहमद आणि सलमान आगा यांनी झिम्बाब्वेचा डाव 32.3 षटकांत 145 धावांतच गुंडाळला. अबरारने 33 धावांत 4 विकेट घेण्याची करामात दाखवली. त्यानंतर सईमने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई करताना 18.2 षटकांत बिनबाद विजयी लक्ष्य गाठले. सईमने 62 चेंडूंत 17 चौकार आणि 3 षटकारांची फटकेबाजी करत नाबाद 113 धावा केल्या. त्याने अब्दुल्ला शफिकसह (नाबाद 32) पहिल्या विकेटसाठी 148 धावांची अभेद्य सलामी दिली.