77 वर्षांनंतर हिंदुस्थानात परतले पाकिस्तानी आजोबा; फाळणीपासून पाकिस्तानात आहे वास्तव्य

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये फाळणी झाल्यापासून पाकिस्तानात वास्तव्य असलेले 92 वर्षीय खुर्शीद अहमद तब्बल 77 वर्षांनंतर हिंदुस्थानातील आपल्या मूळगावी परतले. अहमद यांचे मूळ गाव पंजाबमधील गुरुदासपूर येथील मचरवा हे गाव आहे. मूळगावी पोहोचल्यानंतर खुर्शीद अहमद यांच्या डोळय़ात आनंदाश्रू आले.

आयुष्यातील हा सर्वात मोठा अनमोल क्षण आहे. लहानपणीच्या आठवणी डोळय़ासमोरून तरळल्याचे अहमद यांनी सांगितले. गावात मोठा बदल झाल्याचे ते म्हणाले. खुर्शीद अहमद यांचे आता वय झाल्याने त्यांची स्मरणशक्तीसुद्धा थोडी कमजोर झाली आहे. गावच्या तलावामध्ये कसे पोहोयचो, शेतात गुरे कसे चारायला जायचो, असे भावुक होत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. खुर्शीद यांचे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. खुर्शीद हे आपल्या नातवासोबत हिंदुस्थानात आले. सध्या ते 45 दिवसांच्या व्हिसावर हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत.