इम्रान खान यांना 14 वर्षे कारावास, पत्नीला 7 वर्षे शिक्षा

पाकिस्तानच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना अनुक्रमे 14 आणि 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अल कादिर ट्रस्टशी संबंधित तब्बल 190 पाऊंड म्हणजेच 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर बुशरा बीबी यांना अटक करण्यात आली.

ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना 10 लाख रुपयांचा तर बुशरा बिबी यांना 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड भरला नाही तर इम्रान खान यांना सहा महिने तर बुशरा बिबी यांना तीन महिन्यांचा अधिकचा कारावास भोगावा लागणार आहे.

हुकूमशहा सर्वकाही करतोय

पाकिस्तानातील हुकूमशहा हे सर्व करत आहे. राजकीय द्वेषापायी हे सर्व घडवून आणण्यात आले असून हे लाजीरवाणे आणि अन्यायकारक आहे, असे इम्रान खान म्हणाले. तर न्यायालयाचे खान यांच्यासोबतचे वागणे अत्यंत अन्यायकारक असून इम्रान यांना एका पैशाचाही लाभ मिळालेला नाही. ते निर्दोष आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान तेहराक ए इन्सानच्या अध्यक्षा गोहर खान यांनी दिली.