गेली अनेक दशके ग्लॅमरच्या प्रतीक्षेत असलेल्या खो-खोला आता कुठे वर्ल्ड कपचा टिळा लागणार आहे आणि या अस्सल मऱ्हाटमोळ्य़ा देशी खेळाच्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताननेही खेळावे, हीच इच्छा तमाम खो-खो संघटकांची आहे. मात्र दोन्ही देशांमधील असलेल्या राजकीय संबंधांमुळे हिंदुस्थानी सरकारने अद्याप पाकिस्तानी संघांना व्हिसा दिलेला नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत पाकिस्तानी संघाचा व्हिसाचा अडथळा दूर होईल आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये खो-खोचेही द्वंद्व रंगेल, असा विश्वास हिंदुस्थानी खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी यांनी व्यक्त केला.
क्रीडा विश्वात हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट, हॉकी लढतींना वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. या खेळातील लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी जगाच्या कोपऱयात कुठेही पोहोचतात. तेच ग्लॅमर खो-खोलाही लाभावे आणि खो-खोतही हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात तुल्यबळ लढत व्हावी, अशी खो-खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाची प्रामाणिक इच्छा आहे. या लढतीने खो-खोला प्रचंड लोकप्रियता मिळेल आणि आपल्या खो-खोचाही महिमा अवघ्या विश्वात पसरेल, असा संघटकांना दृढ विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक संघाबरोबर पाकिस्तानच्या संघांचाही समावेश करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न खो-खो महासंघ करत असल्याची माहिती त्यागी यांनी दिली.
स्पर्धेला आता अवघे 11 दिवस उरले आहेत आणि स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम महासंघाला अद्याप जाहीर करता आलेला नाही. याचे प्रमुख कारण पाकिस्तानी संघांचा व्हिसा आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या पुरुष संघाप्रमाणे महिलांचाही संघ पूर्ण ताकदीनिशी तयारी करतोय. वर्ल्ड कप आयोजन समितीने पाकिस्तानचा समावेश असलेला पूर्ण कार्यक्रम आधीच तयार केला आहे. फक्त पाकिस्तानी संघांच्या व्हिसाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. ती मंजुरी मिळताच उद्घाटनीय दिवशीच हिंदुस्थान आणि पाकिस्तानी संघ एकमेकांशी भिडतील, असे निश्चित करण्यात आले आहे.
तूर्तास खो-खोच्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपमध्ये पुरुष गटात 20 तर महिलांचे 19 संघ खेळणार असून त्यांची गटवारीही आखण्यात आली आहे. पाकिस्तानचा संघाला व्हिसा मिळाला तर पुरुषांमध्ये तो हिंदुस्थानच्याच ‘अ’ गटात असेल आणि महिलांमध्येही त्यांना हिंदुस्थानच्याच गटात स्थान देण्यात आले आहे. जेणेकरून किमान एकदा तरी हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील खो-खोचा थरार अवघ्या क्रीडा जगताला पाहता येईल.
लवकरच व्हिसाबाबत स्पष्टीकरण मिळेल
पाकिस्तानचा संघ खेळावा, अशी सर्व खो-खो संघटकांची इच्छा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाकिस्तानच्या व्हिसाचे चित्र स्पष्ट होईल. केंद्र सरकार पाकिस्तानी संघाला व्हिसा देतील, असे आम्हाला वाटत असले तरी आम्ही सरकारच्या मंजुरीची वाट पाहातोय. आम्ही शनिवारपर्यंत व्हिसाची वाट पाहणार. तोपर्यंत व्हिसा मिळाला तर आम्हाला आनंदच होईल. जर त्यात आणखी विलंब होणार असेल तर आम्ही आमचा जो काही निर्णय असेल तो जाहीर करू, असेही त्यागी यांनी स्पष्ट केले.