
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानी संघाचा टी-20 मालिकेत चोथा करत चौथ्या विजयाची नोंद केली आणि पाच सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. पाकिस्तानच्या या लाजीरवाण्या मालिका पराभवामुळे पाकिस्तान माध्यमांसह माजी क्रिकेटपटूही संघाला शिव्यांची लाखोली वाहू लागले आहेत.
आयपीएलमुळे न्यूझीलंडच्या संघातील प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंडने अनेक नवख्या खेळाडूंना या मालिकेत स्थान दिले होते. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर पाकिस्तानी संघातही मोठे बदल पाहायला मिळाले, मात्र न्यूझीलंडच्या नवख्या संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे.
पहिले दोन टी-20 सामने जिंकत न्यूझीलंडने मालिकेत आघाडी घेतली होती, मात्र तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने मालिकेत जिवंत असल्याचे दर्शवले होते, मात्र पुन्हा चौथ्या सामन्यात पराभव पत्करत मालिका गमावली होती. शेवटच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला पुन्हा निराशा पत्करावी लागली. पाचव्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरशः माती खाल्ली. कर्णधार सलमान आगाने एकहाती सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.