पाकिस्तानमध्ये सौदी एअरलाईन्सच्या विमानाला आग, 276 प्रवासी थोडक्यात बचावले

पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर विमानाच्या लॅण्डिंग दरम्यान सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला अचानक आग लागली . विमानाच्या लॅण्डिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने टायर आग लागली. मात्र या आगीत कुठलीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. याशिवाय विमानातील सर्व क्रू आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाचा रियाध ते पेशावर असा विमानाचा प्रवास होता. विमानात 276 प्रवासी आणि 21 क्रू मेंबर्स होते. याप्रकरणी सौदी ए्अरलाईन्सने एक निवेदन जारी करुन म्हंटले आहे की, पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅण्ड होत असताना एका टायरमधून अचानक धूर येऊ लागला. टायरमधून धूर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवाशांना आपत्कालिन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर या घटनेचा तपास सुरू आहे.