PAK Vs SA पाकिस्तानी खेळाडूंचे वर्तन बालिश, निर्लज्जासारखे; नेटकरी भडकले

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी पाकिस्तानात न्यूझीलंड, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तिहेरी मालिका सुरू आहे. या मालिकेत बुधवारी पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेचा सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने जिंकला असला तरी त्यांच्या विजयापेक्षा पाकिस्तानी खेळाडूंच्या गैरवर्तनाची जास्त चर्चा झाली. यजमान असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत केलेले वर्तन नेटकऱ्यांना पटले नसून अनेकांनी पाकिस्तानी खेळाडूंना फटकारले आहे.

पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेत बुधवारी पार पडलेल्या सामन्यात दोन्ही संघांना अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी सामना जिंकणे महत्त्वाचे होते. त्यामुळे दोन्ही संघ अगदी जोशाने खेळत होते. 28 व्या ओव्हरला जेव्हा पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदी गोलंदाजी करत होता. तेव्हा त्याच्यात व दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रित्झके यांच्यात वाद झाला. या वादात शाहिनने मॅथ्यूला शिवीगाळ देखील केली. त्यावेळी मैदानावर असलेल्या खेळाडूंना व पंचांना शाहिनला अडवावे लागले. त्याच्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्याआधी जेव्हा दक्षिण आफ्रिका फलंदाजी करत होती. त्यावेळी 28 व्या ओव्हरला आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा भवुमा हा 82 धावांवर असताना रन आऊट झाला. त्यानंतर जल्लोष करताना पाकिस्तानी खेळाडू अक्षरश: टेम्बाच्या अंगावर आले. त्यामुळे टेम्बाला काही वेळ जागेवरच थांबावे लागले. त्या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या वर्तनाला निर्लज्जपणाचे वर्तन म्हटले आहे.