पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवरील हालचाली वाढवल्या, LoC वर हाय अ‍ॅलर्ट जारी

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यानी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून मोठा हल्ला होऊ शकतो या भितीने पाकिस्तानच्या सीमेवरील हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून LOC प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने बालकोटमध्ये सैन्य घुसवून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्याआधी 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याप्रमाणेच आताही हिंदुस्थान मोठी कारवाई करू शकते अशी भिती असल्याने पाकिस्तानने सीमेवर सुरक्षा वाढवली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गर्भीत इशारा दिला आहे. पहलगाममध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले आहे. यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. सरकार आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल, याची मी देशवासीयांना खात्री देतो. आम्ही केवळ या कृत्याचे कटकारस्थान रचणारे आणि पडद्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचू, असे राजनाथ सिंह म्हणाले.