
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तानला स्पर्धेच्या सलामीच्याच लढतीत न्यूझीलंडकडून 60 धावांनी हार सहन करावी लागली. तसेच गेल्या आठवडाभरात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून सलग तिसऱ्यांदा हार झेलावी लागली आहे. न्यूझीलंडच्या विल यंग (107) आणि टॉम लॅथम (ना.118) यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडने 5 बाद 320 अशी जबरदस्त मजल मारली होती, तर या धावांचा पाठलाग करताना बाबर आझम (64) आणि खुशदिल शाह (69) यांच्याशिवाय पाकिस्तानचा कुणीही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. विल ओरुर्क आणि मिचेल सॅण्टनर यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट टिपत पाकिस्तानचा सहज पराभव केला.
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 5 बाद 320 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात विल यंग (107) व टॉम लॅथम (नाबाद 118) यांनी दणकेबाज शतके झळकावित पाकिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढली. ग्लेन फिलिप्सनेही (61) वादळी अर्धशतक ठोकून न्यूझीलंडला तीनशेपार नेण्यात मोलाची भूमिका बजावली. डेव्हन कॉन्वे (10), केन विल्यम्सन (1) व डॅरिल मिचेल (10) ही आघाडीची फळी झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडची एकवेळ 3 बाद 73 अशी स्थिती झाली होती, मात्र त्यानंतर सलामीवीर विल यंग, टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी जबरदस्त फलंदाजी करीत न्यूझीलंडला 320 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. पाकिस्तानकडून नसीम शाह व हारिस रऊफ यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर अबरार अहमदला एक विकेट मिळाली.