
पाकिस्तानच्या काही भागात आज 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. 12 किलोमीटर खोली असलेला भूकंप दुपारी 12.31 वाजता झाला, असे नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटरने म्हटले आहे. भूकंपाचे केंद्र रावळपिंडीच्या वायव्येस 60 किलोमीटर अंतरावर होते. पंजाब प्रांतातील अटॉक, चकवाल आणि मियानवली जिल्हे आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर, मर्दान, मोहमंद आणि शबकदर येथेही भूकंपाने प्रभाव टाकला. जम्मू-कश्मीरमध्येही भूकंपाचे हादरे जाणवले असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात अनेकदा वेगवेगळ्या तीव्रतेचे भूकंप होत असतात. शेजारील देशात 2005 मध्ये सर्वात प्राणघातक भूकंप झाला होता, ज्यात 74,000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता.