तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा ऐतिहासिक मालिका विजय

पाहुण्या पाकिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमानुसार 36 धावांनी धुव्वा विजयाच्या हॅटट्रिकसह ऐतिहासिक मालिका विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरात एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ असल्याने हा मालिका विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिकच होय. अष्टपैलू कामगिरी करणारा सैम अयूब तिसऱ्या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळही त्याच्याच गळ्यात पडली.

पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या लढतीत पाकिस्तानने 47 षटकांच्या खेळात 308 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा डाव 42 षटकांत 271 धावांवरच संपुष्टात आला. त्यांच्याकडून हेन्रीच क्लासेनने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. याचबरोबर कॉर्बिन बॉश (40), रॅसी वॅन डेर डुसेन (35), टोनी डी झोर्झी (26) व मार्को जॅन्सेन (26) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पाकिस्तानकडून सुफियान मुकीमने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले. शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह यांनी 2-2, तर मोहम्मद हसनैन व सैम अयूब यांनी 1-1 विकेट टिपला.

अयूबचे शतक; बाबर, रिझवानची अर्धशतके

त्याआधी, पाकिस्तानने 308 अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर सैम अयूबने 94 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. याचरोबर बाबर आझम (52) व कर्णधार मोहम्मद रिझवान (53) यांनीही अर्धशतके ठोकून दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. याचबरोबर सलमान आगा (48) व तय्यब ताहीर (28) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. आफ्रिकेकडून रबाडाने 3, तर यान्सेन व फोर्टुझन यांनी 2-2 फलंदाज बाद केले.