चमत्कार… चॅम्पियन्स करंडकासाठी स्टेडियमची तयारी 30 जानेवारीपर्यंत पूर्ण, पीसीबीने आयसीसीला दिले आश्वासन

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडकाच्या पाकिस्तानातील मैदानांच्या नूतनीकरणाचे काम 50 टक्केही झालेले नसताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) येत्या 30 जानेवारीपर्यंत स्टेडियम खेळण्यासाठी सज्ज असतील, असे आश्वासन आयसीसीला दिले आहे. पीसीबीच्या आश्वासनामुळे त्यांनी चमत्कारिकरीत्या अपुरे स्टेडियम पूर्ण केले की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

येत्या 19 जानेवारीपासून पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र सध्या लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम, कराची येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

गद्दाफी स्टेडियम आणि नॅशनल स्टेडियममध्ये नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गद्दाफी स्टेडियमचे नूतनीकरण पूर्ण झाले असून या महिन्याच्या अखेरीस हे स्टेडियम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल, तर रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियम हेदेखील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळीतील सामने खेळण्यासाठी सज्ज झाले आहे, अशी माहिती पीसीबीचे प्रवक्ते समी उल हसन यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून पीसीबी या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. दरम्यान, आयसीसी, पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातील करारानुसार हिंदुस्थानचे सर्व सामने दुबईत होणार असून जर हिंदुस्थान उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यास ते सामने दुबईत खेळवले जातील, मात्र हिंदुस्थान स्पर्धेतून बाद झाल्यास उपांत्य आणि अंतिम सामने हे पाकिस्तानातच खेळविले जाणार आहेत. नूतनीकरण करण्यात आलेल्या गद्दाफी स्टेडियमच्या आसन व्यवस्थेच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही क्षमता 35 हजारांनी वाढवण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचे आयोजन करण्यासाठी गद्दाफी स्टेडियम सज्ज असेल यात आम्हाला शंका नाही. नॅशनल स्टेडियमचे नूतनीकरण 30 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे हसन यांनी सांगितले.