पाकड्यांना युद्धाची खुमखुमी; नियंत्रण रेषेसह आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार, हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढलेला असताना पाकिस्तानच्या कुरापती काही कमी झालेल्या नाहीत. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गेल्या सहा दिवसांपासून गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून लहान शस्त्रांद्वारे गोळीबार करत आहे. याला हिंदुस्थानी लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशात सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे.

पाकिस्तानने आता राजौरी जिल्ह्यातील नौशेरा आणि सुंदरबन सेक्टरमध्ये आणि जम्मूमधील अखनूर, परगवाल सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे. नियंत्रण रेषेसह पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्करही या गोळीबाराला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे.

परगवाल सेक्टरमध्ये अतिरिक्त बीएएसएफ जवान तैनात करण्यात आले आहे. या भागामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून याची माहिती लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या 20 चौक्यांचे व्हिडीओ आणि फोटो लष्कराकडे आहेत. हिंदुस्थानी लष्करही त्यांना उत्तर देत आहे, मात्र पाकिस्तान लहान शस्त्रांचा वापर करत असल्याने हिंदुस्थानकडूनही तोफांचा मारा करण्यात आलेला नाही.

पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती

दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनंतनाग, पुलवामा, शोपियानमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांना घेरण्यात आले असून एक-एक करुन त्यांचा सफाया करण्यात येईल. तसेच यादी बनवण्यात आलेल्या दहशतवाद्यांची घरांवरही बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे.

पहलगामचा बदला! लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य!! पंतप्रधान मोदी म्हणाले… टाईम, टार्गेट आणि अ‍ॅटॅक कसा करायचा हे तुम्हीच ठरवा!