झुकेगा पाकिस्तान? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोडग्याची बैठक आज, आयसीसी मध्यम मार्ग काढण्याच्या प्रयत्नात

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा फैसला घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित व्हर्च्युअल बैठक आयसीसी आता आज शनिवारी घेतेय. एकीकडे हिंदुस्थानी सरकारने क्रिकेट संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान पूर्ण स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आयसीसी संकटात सापडली आहे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आयसीसी असल्यामुळे झुकेगा नहीं म्हणणाऱया पाकिस्तानचा राग शमविण्याचे चोहोबाजूंनी प्रयत्न केले जात आहेत.

आगामी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानलाही ही स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानातच आयोजित करायची आहे. पण हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दर्शवल्यामुळे पाकिस्तानवर हिंदुस्थानचे सामने आणि बाद फेरीचे सामने तटस्थ ठिकाणी खेळविण्याबाबत दबाव आणला जात आहे. मात्र पाकिस्ताननेही त्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. अशा स्थितीत स्पर्धेचे आयोजन लांबणीवर पडल्यास पाकिस्तानला प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. पाकिस्ताननेही स्पर्धा आयोजनाबाबत कठोर भूमिका घेताना जर हिंदुस्थान पाकिस्तानात खेळणार नसेल तर आगामी आयसीसी स्पर्धांत पाकिस्तानी संघही हिंदुस्थानात खेळणार नसल्याचे कळवल्यामुळे आयसीसीही संकटात सापडली आहे. ही परिस्थिती संयमाने हाताळण्यासाठी आयसीसीने अनेक पर्याय समोर आणले असून ते पाकिस्तानला किमान एका पर्यायावर राजी करून स्पर्धा आयोजनाचा तिढा सोडवतील, असा विश्वास आहे.

शहांवर सर्वांच्या नजरा

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष बार्कले यांची शनिवारी होणारी अखेरची बैठक आहे. या बैठकीत तोडगा निघो अथवा न निघो, पाकिस्तानसह अनेक सदस्य देशांना नवनिर्वाचित अध्यक्ष जय शहा यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ते जागतिक क्रिकेटच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेत चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा मार्ग सुकर करतील, असा विश्वास आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी जय शहा नक्की कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थानसह पाकिस्तानी सरकारलाही मान्य होईल, अशा तोडग्याची शहा यांच्याकडून अपेक्षा आहे.

काय होऊ शकते…

हिंदुस्थानचे पाकिस्तानात खेळणे तूर्तास अशक्य असल्यामुळे आयसीसी हायब्रिड मॉडेलचा पर्याय आयसीसी सदस्यांकरवी मतदान पद्धतीने मंजूर करून पाकिस्तानवर दबाव आणू शकतात. आयसीसीच्या 12 सदस्यांपैकी किमान 7 सदस्यांनी हायब्रिड मॉडेलला आपले मत दिल्यानंतर हा पर्याय स्वीकारायचा की विरोध करायचा हा पाकिस्तानचा प्रश्न असेल. पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलला विरोध केल्यास त्यांना यजमानपद गमावण्याचीही भीती आहे. त्यामुळे पाकिस्तान आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी दोन पावले मागे घेत एक उपांत्य सामना पाकिस्तानात खेळवण्यावरही भर देऊ शकतो. तसेच हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीत न पोहोचल्यास किंवा अंतिम फेरीत न पोहोचल्यास ते सामने पाकिस्तानात फिरवण्याच्या पर्यायालाही मंजुरी देऊ शकतो. स्पर्धेबाबत अनेक जरतर असले तरी आयोजनाचा वाद आयसीसी शनिवारी सोडवून कामाला लागण्याची शक्यता आहे. तूर्तास पाकिस्तान कोणत्या पर्यायावर कबूल है म्हणेल, हे शनिवारच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.