![jammu-kashmir-army](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/08/jammu-kashmir-army-696x447.jpg)
जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवरील हिंदुस्थानी चौक्यांच्या दिशेने बुधवारी रात्री उशिरा युद्धखोर पाकड्यांनी बेछूट गोळीबार केला. अचानक हल्ला करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या या पाकड्यांना हिंदुस्थानी लष्कराने मुंहतोड जबाब दिला. दोन्ही सैन्यांमध्ये एलओसीवर जोरदार धुमश्चक्री उडाली. यात हिंदुस्थानी लष्कराचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही; परंतु पाकिस्तानी सैन्याचे मात्र प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे आणि मोठया संख्येने जवानांना हिंदुस्थानी लष्कराने पंठस्नान घातल्याची माहिती मिळाल्याचे हिंदुस्थानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानी लष्कराकडून कुठल्याही प्रकारची हरकत किंवा एलओसीवरील कायद्याचे उल्लंघन केले गेलेले नसताना पाकिस्तानी सैन्याने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. मंगळवारी अखनूर येथील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात हिंदुस्थानी लष्कराच्या कॅप्टनसह जवान शहीद झाला होता. त्यानंतर बुधवारी रात्री पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी अचानक हिंदुस्थानी चौक्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. 25 फेबुवारी 2021 मध्ये दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर खूप कमी वेळा त्याचे उल्लंघन झाले आहे. सर्वाधिक पाकिस्तानच्या बाजूनेच शस्त्रसंधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून व्हिडीओ व्हायरल
एलओसीवर तारपुंडी येथे हिंदुस्थानच्या अग्रीम चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा व्हिडीओ पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सोशल मीडियावरून व्हायरल केला आहे, मात्र या व्हिडीओवर कुठलीही तारीख नाही. त्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना अधिकारी श्रद्धांजली देताना दिसत आहेत.
शस्त्रसंधी वाढवल्यानंतर पाकड्यांकडून उल्लंघन
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये 2021 मध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला होता. शस्त्रसंधी वाढवल्यानंतर पाकिस्ताननेच सर्वात आधी या कराराचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. बुधवारी पाकड्यांनी केलेला गोळीबार हे या वर्षातील पहिले उल्लंघन असून गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून होत असलेल्या घुसखोरीमुळे सीमेवर तणाव वाढला आहे. पाच दिवसांत चौथ्यांदा घुसखोरी झाली. यादरम्यान गस्त घालताना आयईडीच्या स्फोट झाल्याचे हिंदुस्थानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्यात उडालेल्या धुमश्चक्रीत हिंदुस्थानी लष्कराचा ज्युनियर कमिशन अधिकारी जखमी झाला. सीमेवर चुकून भुसुरुंगावर त्यांचा पाय पडला. त्यामुळे झालेल्या स्फोटात ते जखमी झाले.