ऍडलेडपाठोपाठ पर्थवरही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी विजयाचा जश्न साजरा केला. पाकिस्तानने नव्या दमाच्या ऑस्ट्रेलियन संघाचा तिसऱया व निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 8 विकेट व 139 चेंडू राखून धुव्वा उडविला. या विजयासह पाकिस्तानने तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियात वन डे मालिका 2-1 फरकाने जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. नसीम शाह, शाहीन आफ्रिदी व हारिस रऊफ या वेगवान त्रिकुटाची भन्नाट गोलंदाजी आणि त्यानंतर सर्वच फलंदाजांनी दिलेले योगदान ही पाकच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. दोन विकेट टिपणाऱया आणि मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया हारिस रऊफच्या गळय़ात सामनावीर व मालिकावीराची माळ पडली.
यजमान ऑस्ट्रेलियाला 31.5 षटकांत 140 धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानने अवघ्या 26.5 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 143 धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. सईम अयूब (42) क अब्दुल्ला शफिक (37) यांनी 17.1 षटकांत 84 धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. शफिकने 53 चेंडूंत एक षटकार व एक चौकार लगावला, तर अयूबने 52 चेंडूंत 4 चौकारांसह एक षटकार ठोकला. लान्स मॉरिसने 18व्या षटकात ही सलामीची जोडी तंबूत पाठविताना पहिल्या चेंडूवर शफिकला पायचीत पकडले, तर अखेरच्या चेंडूवर अयूबचा त्रिफळा उडविला. त्यानंतर बाबर आझम (नाबाद 28) व कर्णधार मोहम्मद रिझवान (नाबाद 30) यांनी 58 धावांची अभेद्य भागीदारी करीत पाकिस्तानच्या विजयाला गवसणी घातली.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची 31.5 षटकांत केवळ 140 धावांवर दाणादाण उडाली. नसीम शाह, शाहीन आप्रिदी व हारिस रऊफ यांच्या तिखट माऱयापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चक्क गुडघे टेकलेले अवघ्या क्रिकेटविश्वाने बघितले. त्यांच्याकडून सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट (22) व सीन अबॉट (30) यांनाच फक्त धावांची विशी ओलांडता आली. त्यानंतर ऍरोन हार्डी (12), ऍडम झम्पा (13) व स्पेन्सर जॉन्सन (नाबाद 12) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. 22 अवांतर धावांचा खुराक मिळाला म्हणून ऑस्ट्रेलियाला 140 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. शाहिन आप्रिदी व नसीम शाह यांनी 3-3 फलंदाज बाद केले, तर हारिस रऊफने 2 विकेट टिपले. हसनैनलाही एक विकेट मिळाला.
पाकिस्तानची मुसंडी
यजमान ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील सलामीच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला होता. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने जोरदार मुसंडी मारत पुढील दोन्ही सामने जिंकून इतिहास रचला. अॅडलेड ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या वन डेत पाकिस्तानने 9 गडी राखून शानदार विजय मिळविला. आता तिसरा सामना जिंकून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखविला.
2002 ला जिंकली होती अखेरची मालिका
ह पाकिस्तानने तब्बल 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी, 2002 मध्ये पाकिस्तानने अखेरच्या वेळी हा पराक्रम केला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा मालिकाविजय पाकिस्तानी संघासाठी नक्कीच बळ देणारा ठरणार आहे. शिवाय मोहम्मद रिझवाननेही आपल्या कर्णधारपदाची दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया दौऱयातच रिझवानची पाकिस्तानी संघात कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 140 धावांवर गारद झाला. दरम्यान, हारिस रऊफने मालिकेत तिसऱयांदा ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. तीन सामन्यांत एकूण 10 विकेट टिपल्याने तो मालिकावीर ठरला.