पाकिस्तानने आज अफगाणिस्तानच्या पूर्व भागात केलेल्या हवाई हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबान सरकारने केला आहे. यात महिला आणि मुलांचा मोठय़ा संख्येने समावेश असल्याचे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तान सरकारमधील प्रवत्ते हमदुल्लाह फीत्रत यांनी याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पक्तीका प्रांतात हा हल्ला करण्यात आला. यात सहा जण गंभीर जखमी झाल्याचेही फीत्रत यांनी सांगितले. दरम्यान, या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा अफगाणिस्तानने दिला आहे.
दुसरीकडे पाकिस्तानी तालिबान म्हणजेच तहरीक ए तालिबान पाकिस्तानचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त वाहिन्यांनी केला आहे. तसेच अनेक दहशतवाद्यांचा खात्मा या हल्ल्यात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तर पाकिस्तानी तालिबान किंवा तेहरीक ए तालिबानचे प्रवत्ते मोहम्मद खुरासानी यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि यात 27 महिला आणि मुलांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रांतात काही संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी अलीकडेच केला होता. त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अफगाणिस्तान देणार प्रत्युत्तर
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेक नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा आणि हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मातृभूमीचे रक्षण करणे हा आमचा अधिकार असून आम्ही या भ्याड हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.