पैठण तालुक्यातील आडुळ ग्रामपंचायत कार्यालयाची कर्मचाऱ्यांनीच तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. खिडक्यांच्या काचा व नेमप्लेट फोडून खुर्थ्यांची दुरावस्था केली गेली. या कर्मचाऱ्यांचा 7 महिन्यांचा पगार थकीत असताना केवळ 6 हजार रुपयांचा बोनस व तोसुद्धा सुट्ट्या लागल्यानंतर बँक खात्यात टाकण्यात आल्यामुळे ऐन दिवाळीत हा उद्रेक पाहायला मिळाला.
दीपावलीच्या सणाची सर्वत्र खरेदी सुरू आहे. असे असतानाही 7 महिन्यांपासून पगार नसलेल्या आडुळ ग्रामपंचायतीमधील 8 कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले. अनेक वेळा मागणी करुनही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत खरेदी करावी कशी ? असा प्रश्न पडलेल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दालनातील काचा, खिडक्या फोडून आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार दिवाळीच्या पूर्वसंध्येला 31 रोजी सायंकाळी 5.30 वाजता
घडला. दिवाळी सणाला ग्रामपंचायत प्रशासन बोनस व थकीत पगार देईल, या आशेवर असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकीत पगार न देता त्यांच्या बँक खात्यात फक्त 6 हजार रुपये बोनस तोही 31 ऑक्टोबरच्या सायंकाळी चारच्या सुमारास म्हणजेच बँक बंद होण्याच्या काही मिनिटे अगोदर टाकले. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावरच हल्लाबोल केला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरपंच, ग्रामविकास अधिकारी किंवा एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नव्हता.
तथापि उपसरपंच जाहेर शेख, सदस्य भाऊसाहेब पिवळ, नारायण पिवळ व आजीम शेख यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांनी ‘आमचा थकीत पगार त्वरित द्या’ अशी मागणी लावून धरली होती. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील खुर्च्छा अस्ताव्यस्त फेकून दिल्या. खिडक्या, सरपंचाच्या दालनातील काचा आणि नेमप्लेट फोडून रोष व्यक्त केला. या कार्यालयात पाणीपुरवठा कर्मचारी संजय पिवळ, विजय पिवळ, अंकुश राठोड, विठ्ठल जाधव, सफाई घंटागाडी चालक सय्यद शामद, सफाई कामगार लताबाई शेलार, रामभाऊ चांदणे व शिपाई लतीफ आत्तार असे एकूण 8 कर्मचारी कार्यरत आहेत.
करवसुली करून बोनसची तरतूद केली
याबाबत ग्रामविकास अधिकारी सचिन डिघुळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘कर्मचाऱ्यांचा किती पगार थकीत आहे. मला आत्ता सांगता येणार नाही. मी 15 दिवसांपूर्वीच प्रभारी पदभार घेतला आहे. असे असले तरी मी करवसुली करुन प्रत्येकी 6 हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता काचा फोडल्या… सणानंतर काम बंद आंदोलन, कर्मचाऱ्यांचा इशारा
पाणीपुरवठा कर्मचारी संजय पिवळ यांनी सांगितले की, केवळ 6 हजार रुपयात संपूर्ण कुटुंब दिवाळी कशी साजरी करणार ? थकीत पगार का दिला नाही? पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कामगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे. अन्यथा आता काचा फोडल्या. दिवाळसणानंतर काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.