एम. एफ. हुसेन यांच्या पेंटिंगची 118 कोटींना विक्री, न्यूयॉर्कच्या लिलावात रचला इतिहास

जगप्रसिद्ध हिंदुस्थानी चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या  पेंटिंगने  इतिहास रचला. त्यांचे ‘अनटाइटल्ड (व्हिलेज ट्रीप)’ पेंटिंग 1.38 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 118 कोटी रुपयांना विकले गेले आहे. हिंदुस्थानी कलाक्षेत्राच्या इतिहासातील हे सर्वाधिक महागडे पेंटिंग ठरले. कलासंग्राहक किरण नाडर यांनी ही कलाकृती विकत घेतली.

न्यूयॉर्क येथे 19 मार्च रोजी क्रिस्टीज लिलाव पार पडला.  लिलावात एम. एफ. हुसेन यांच्या पेंटिंगने नवा विक्रम प्रस्थापित केला. 1954 मध्ये साकारलेल्या या पेंटिंगचा 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक लिलाव करण्यात आला. त्यामुळे या विक्रीला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

क्रिस्टीजच्या दक्षिण आशियाई आधुनिक आणि समकालीन कला विभागाचे प्रमुख निषाद आवारी यांनी या ऐतिहासिक घडामोडीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आधुनिक आणि समकालीन दक्षिण आशियाई कला बाजाराची मोठी वाढ दिसून येत आहे. एम. एफ. हुसेन यांचे हे पेंटिंग कलाक्षेत्राच्या अभिजाततेचे प्रतीक आहे.’

हुसेन यांचे पेंटिंग सर्वप्रथम नॉर्वेजियन सर्जन लिओन एलियास वोलोडास्का यांनी खरेदी केले होते. त्यांनी 1954 साली नवी दिल्लीत विकत घेतले. 1964 मध्ये त्यांनी ते ओस्लो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलला दान केले. तेथे ते खासगी न्यूरोसायन्स कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ते उपलब्ध नव्हते.

अमृता शेरगिल यांचा विक्रम मोडला

याआधी अमृता शेरगिल यांचे ‘द स्टोरी टेलर’ (1937) हे चित्र हिंदुस्थानी चित्रकलेच्या इतिहासातील सर्वाधिक महागडे ठरले होते. हे चित्र सप्टेंबर 2023 मध्ये 61.8 कोटी रुपयांना विकले गेले होते. मात्र आता एम. एफ. हुसेन यांच्या पेंटिंगने अमृता शेरगिल यांचा विक्रम मोडला.

14 फूट रुंद असलेली अद्वितीय कलाकृती

1954 साली साकारलेली ही कलाकृती सुमारे 14 फूट रुंद आहे आणि  ग्रामीण जीवनाचे चित्रण आहे.  चित्राच्या मध्यभागी एक पुरुष आणि स्त्राr बैलगाडीवर प्रवास करताना दिसतात, जे हिंदुस्थानच्या कृषी परंपरेचे प्रतीक आहे. चित्रात 13 वेगवेगळी दृश्ये आहेत, जी हुसेन यांच्या शैलीचा उत्तम आविष्कार घडवतात.