विडीचे व्यसन जीवावर बेतले, कामगाराचा होरपळून मृत्यू

छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय एका घटनेवरुनन आला आहे. एका चुकीमुळे पेंटरला आपला जीव गमवावा लागला आहे. रंगकाम झाल्यानंतर पेंटरने थिनरने हाताला लागलेला रंग साफ केला. यानंतर तात्काळ त्याने विडी पेटवली. मात्र विडी पेटवताच त्याच्या हाताला लावलेल्या आणि कपड्यांवरील थिनरमुळे आग भडकली आणि तो आगीत होरपळला.

मध्य प्रदेशातील भोपाळच्या शाहपुरा परिसरात ही घटना घडली. राजेश असे मयत पेंटरचे नाव आहे. तो पेशाने पेंटर होता. राजेशला विडी ओढण्याचे व्यसन होते. नेहमीप्रमाणे त्याने आपले रंगकाम पूर्ण केले. त्यानंतर त्याला विडीची तलप आल्याने त्याने विडी पेटवली.

विडी पेटवताच कपड्यांना लागलेल्या आणि हाताला लावलेल्या थिनरने पेट घेतला. यात गंभीर भाजलेल्या राजेशला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.