Pahalgam Terror Attack – एअर इंडियाची मोठी घोषणा, श्रीनगरहून दिल्ली- मुंबईसाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आपल्याच देशात लोक सुरक्षित नसल्यामुळे मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांसाठी एअर इंडियाने मोठी घोषणा केली आहे. श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे जाहीर केली आहेत.

एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर याबाबत माहिती दिली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडिया बुधवार,23 एप्रिल रोजी श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहे. श्रीनगरहून दिल्लीसाठी सकाळी साडे अकरा वाजता आणि मुंबईसाठी दुपारी बारा वाजता विमानसेवा सुरू होईल. तसेच एअर इंडिया 30 एप्रिलपर्यंत या मार्गांने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत रीबुकिंग सुविधा आणि पूर्ण परतफेड देखील देईल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा सौदी अरेबिया दौरा रद्द केला आहे. तसेच या हल्ल्यातील सहा हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण प्रदेशात शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख शहरे आणि पर्यटन केंद्रांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.