Pahalgam Terrorist Attack – भावाला भावा विरुद्ध लढवण्याचा दहशतवाद्यांचा डाव! पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे कश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमीची रुग्णालायत भेट घेऊन विचारपूस केली आहे. भावाला भावाविरोधात लढवण्यासाठी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. मात्र, हिंदुस्थानी एकजूट आहेत आणि दहशतवाद्यांना कधीच यश मिळणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. जखमीच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपालांची भेट घेतली.

इथे काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आलो आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि त्यांना संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. हल्ल्यातील एका जखमीची मी भेट घेतली. या हल्ल्यात ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. या परिस्थितीत देश एकजूट आहे. आमची सरकारसोबत काल बैठक झाली. विरोधी पक्षांनी या बैठकीत हल्ल्याचा निषेध केला. सरकार जी काही कारवाई करेल, त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका आम्ही जाहीर केली, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

समाजात फूट पाडणं हा या हल्ल्या मागचा हेतू आहे. भावाला भावा विरोधात लढवायचं. आणि आता हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकाने एकजूट व्हावं, एकत्रं यावं आणि आपण दहशतवाद्यांना प्रयत्न उधळून लावू, असे राहुल गांधी म्हणाले.