
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान- पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. तसेच हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आणि त्यातच त्यांच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये जागतिक पातळीवर त्यांनाच अडचणीची ठरत आहेत. त्यामुळे आता त्या वक्तव्यांपासून घूमजाव करण्याची वेळ पाकड्यांवर आली आहे. हिंदुस्थानने कठोर पावले उचलल्यानंतर क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र हिंदुस्थानसाठी तयार ठेवली आहेत, अशी दर्पोक्ती करणाऱ्या पाकड्यांची चांगलीच तंतरलेली दिसत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी सैन्यही धास्तावले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, कधीही काहीही होऊ शकते म्हणून आम्ही आमच्या सैन्याची ताकद आणखी वाढवली आहे. तसेच त्यांनी अण्वस्त्रांबाबत विधीन केले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यावर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे सांगत त्यांनी सारवासारव केली आहे.
ख्वाजा आसिफ म्हणाले होते की, पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. आपल्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच आपण आपली अण्वस्त्रे वापरू. युद्ध झाले तर आपण त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहोत. पुढील दोन ते तीन किंवा चार दिवसांत युद्ध भडकण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत युद्धाचा धोका आहे पण तो टाळता येऊ शकतो. हिंदुस्थानशी युद्धाची दर्पोक्ती करणारे ख्वाजा आसिफ म्हणाले होते की पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबा संपला आहे. लष्करचे पाकिस्तानशी भूतकाळात संबंध होते. आता ही दहशतवादी संघटना संपली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हिंदुस्थानशी युद्धाची भाषा करणारे आणि अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्यानंतर विधान अंगलट येताच आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आपल्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच आपण आपली अण्वस्त्रे वापरू, असा खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.