
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली. तसेच त्यांची तंतरली असल्याचे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसून आले. आता हिंदूस्थानकडून लष्करी कारवाईच्या शक्यतेमुळे पाकिस्तान चांगलेच धास्तावले आहे. अशा परिस्थितीत, हिंदूस्थानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य अनेक पावले उचलत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी हवाई हल्ल्याबाबत पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि अशा हल्ल्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्य सियालकोट सेक्टरमधील महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी त्यांची रडार यंत्रणा तैनात करत आहे. तसेच फिरोजपूरला लागून असलेल्या भागात हिंदुस्थानींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काही ठिकाणी टेहळणी सामग्री तैनात करत आहे. पाकिस्तानने यापूर्वी आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 58 किमी अंतरावर असलेल्या चोर कॅन्टोन्मेंटमध्ये TPS-77 रडार तैनात केले होते.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या सलग पाचव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि गोळीबार केला. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार सुरू केला. यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
Pahalgam Terrorist Attack – पाकड्यांची तंतरली; अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीपासून घूमजाव