Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक ओडीशा व गुजरातमधील पर्यटकांचा समावेश असल्याचे समजते. आज तक या वृत्तवाहिनीने याबाबत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

मंगळवारी अडीचच्या सुमारास बैसरन खोऱ्यात सात ते आठ दहशतवादी लष्करी जवानांच्या गणवेशात घटनास्थळी आले व त्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 27 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून समजते. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबाच्या TRF या संघटनेने घेतली आहे. दरम्यान लष्कर, सीआरपीए, बीएसएफ, जम्मू कश्मीर पोलीस, आयबीचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले आहेत.

दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, सोडणार नाही; पंतप्रधान मोदींकडून निषेध

पहलमागमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला. जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांसाठी शक्य ती सर्व मदत पुरवली जाईल. या हल्ल्यातील पीडितांना न्याय दिली जाईल आणि हल्लेखोरांना सोडणार नाही. त्यांचा राक्षसी अजेंडा कधीच सफल होणार नाही. दहशतवाद विरोधातील लढाई कायम राहील आणि आणखी ताकदीने लढली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमधून म्हटले आहे.

अमित शहा श्रीनगरसाठी रवाना

या घटनेनंतर काही तासातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी त्यांनी सर्व गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती.