Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा

जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी पहलगाममध्ये चूक झाल्याचे मान्य केले आहे.

”या बैठकीत आयबी व गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना ही घटना कशी घडली व कुठे चूक झाली ते सांगितलं. जिथे घटना झाली. तिथे पायी किंवा घोड्यावर जावं लागतं. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना ही चूक झाली. या घटनेने सर्व दुखी आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय काय करणार ते सांगितले”, असे रिजीजू म्हणाले.

”राजनाथ सिंह यांनी सीसीएस बैठकीत काय निर्णय घेतले ते सांगितले. दहशतवादा विरोधातील झिरो टॉलरन्स प़ॉलिसीविषयी देखील सांगितले. या प्रकरणी सरकार कडक कारवाई करणार आहे. गेल्या काही वर्षापासून कश्मीरमध्ये सर्व काही शांततेत सुरू होते. सर्व काही चांगले सुरू होते. मात्र या घटनेने वातावरण खराब केलं आहे. त्यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. सर्वांनी आपलं मत ठेवलं. देशाला एकजूट आणि एकत्र उभं राहून दहशतवादाविरोधात लढायला हवे. त्यानंतर सर्व पक्षांनी दहशतवादाविरोधात सरकारसोबत आहोत. देश उभा आहे हा संदेश सर्व पक्षांनी दिला आहे. सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला साथ देऊ असेही सांगितले. एक दुसऱ्या विरोधात राजकारण न करता एकत्र राहू असा संदेश सर्व पक्षांनी दिला आहे, असेही रिजीजू यांनी सांगितले.