महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक कश्मीरात अडकले, हादरून गेलेले पर्यटक परतण्याच्या तयारीत

मुंबई, पुणे, ठाणे, मराठवाडा, विदर्भातून कश्मीरमध्ये पर्यटनाकरिता गेलेले शेकडो पर्यटक खोऱ्यात अडकून पडले आहेत. पर्यटक हल्ल्याच्या घटनेने हादरून गेले असून आता मिळेल त्या मार्गाने घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक पर्यटक सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून मदतीची याचना करत आहेत.

नागपूरमधले 200 पर्यटक संपर्कात

नागपूरच्या जरीपटका भागातील रुपचंदानी कुटुंब पर्यटनासाठी कश्मीरमध्ये गेले होते. बैसरन व्हॅलीत तिलक रुपचंदानी, पत्नी सिमरन आणि मुलगा गर्व जाणार होते. दरम्यान गोळीबार झाल्याने जंगलात पळत सुटले. त्यात सिमरन घसरून पडल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. ते गुरुवारी विमानाने नागपूरला येणार आहेत.

नागपूरमधील 200 पर्यटक आपल्या संपका&त आहेत. हे पर्यटकही रेल्वे किंवा विमानाने नागपूरला येतील, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी दिली.

पाऊस आला आणि…

परभणीचे भास्कर डांगे सहकुटुंब पर्यटनासाठी गेले होते. ते पहलगामजवळील बैसरण घाटी येथे जाणार होते. परंतु पाऊस सुरू झाल्याने टय़ुलीप गार्डन बंद राहणार असल्याचे समजले. म्हणून ते कार्यक्रम रद्द करून श्रीनगरला गेले. हिंगोलीतील शुभम आणि रचना अग्रवाल हे नवदांपत्यही सोमवारी रात्री पहलगामहून श्रीनगरला पोहोचले. ते येथील हॉटेलमध्ये सुखरूप आहेत.

अकोल्यातील 16 पर्यटकांसह एकूण 30 जण जम्मू-कश्मीरला गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे जाणार होते. मात्र हल्ल्याची माहिती मिळताच त्यांना रोखण्यात आले. सर्व पर्यटक सोनमर्ग येथून श्रीनगरमध्ये आले.

हॉटेलमालकाने रोखले

बुलढाण्याचे पाच पर्यटकही थोडक्यात बचावले. तेही इथल्या हॉटेलमधून निघण्याच्या तयारीत होते. परंतु हल्ल्याचे वृत्त समजताच हॉटेल मालकाने त्यांना जाण्यापासून रोखले. बुलढाण्यातील अरुण आणि नीलेश जैन हे बंधू पत्नी आणि मुलांसह कश्मीरला गेले होते. हल्ला झाला तेव्हा ते पहलगामला हॉटेलवर होते. त्यामुळे थोडक्यात बचावले.

पंढरपूरचे 50हून अधिक पर्यटक कश्मीर दौरा अर्धवट टाकून परत येऊ इच्छितात. हल्ल्यामुळे ते घाबरून गेले आहेत. सांगली येथील पालांदे कुटुंबीयही हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्ला झाला त्या ठिकाणाहून अडीच-तीन तास आधी ते निघून गेले म्हणून वाचले. अमरावतीचे बोडके, देशमुख, उमेकर आणि लांडे कुटुंबीय हेही असेच थोडक्यात वाचले.

धाराशीवमधील राष्ट्रवादीचे बिराजदार खोऱ्यात अडकून

धाराशीवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार कुटुंबीयांसह खोऱ्यात अडकले आहेत. हल्ल्याच्या ठिकाणाहून ते तीन-चार किलोमीटर अंतरावर होते. हल्ल्याची घटना कानावर पडताच त्यांच्या स्थानिक ड्रायव्हरने त्यांना हॉटेलवर आणून सोडले. ते सुखरूप आहेत. धाराशीवमधील दुर्गडे दांपत्य आपल्या मुलांसह फिरायला गेले होते. ते सर्व जण अमृतसरमध्ये सुरक्षित आहेत.

घोडे मिळाले नाहीत म्हणून वाचलो

कोल्हापूर, सांगलीतूनही 28 पर्यटकांचा गट खोऱ्यात अडकला होता. पहलगामसाठी दुपारी घोडय़ांची वाट पाहत ते थांबले होते. तितक्यात ड्रायव्हरने तिथे हल्ला झाल्याचे सांगून सावध केले. ही मंडळी सुखरूप आहेत.

मुंबईतील 250 पर्यटक कश्मीरात अडकले

महाराष्ट्राच्या सुमारे 300 पर्यटकांशी आज सायंकाळपर्यंत संपर्क होऊ शकला आहे. त्यामधील बहुतांश 250 पर्यटक हे एकटय़ा मुंबईतील आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. साहजिकच प्रत्येकाच्या मनात भीती आणि चिंता आहेच, पण सर्वात जास्त म्हणजे त्यांना घराची ओढ लागली आहे. आम्हाला लवकर इथून बाहेर काढा, अशी विनंती त्यांनी केली.