
श्रीनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि सोबत लहान मुले असल्यामुळे आम्ही पहलगामला गेलो नाही. त्यामुळे ‘देवानेच आम्हाला वाचवले’, अशी कृतार्थ भावना मुंबईच्या अतुल कदम यांनी व्यक्त केली.
‘हिंदुस्थानचे स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेले पहलगामला जाण्यासाठी आम्ही तयार होतो, मात्र पावसामुळे जम्मूला जाणारे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे आम्ही पहलगामला जाण्याचा निर्णय रद्द केला. पहलगामला जायला मिळाले नाही म्हणून काहीसा हिरमोड झाला, मात्र मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून आपण सुदैवाने वाचल्याची भावना कदम यांनी व्यक्त केली.
काळ आला होता, पण…
जम्मू-कश्मीरला फिरण्यासाठी जायचे असल्याने फेब्रुवारीपासूनच प्लॅन केला होता. पत्नी, मुलगा, पुतण्या आणि एक मित्र सहकुटुंब गेलो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जम्मूला जाणारा मार्ग बंद झाला. शिवाय सुट्टीही मर्यादित असल्याने आम्ही परतण्याचा निर्णय घेतल्याचे कदम म्हणाले. काळ आला होता, मात्र सुदैवाने आम्ही वाचल्याचेही कदम यांनी सांगितले.