पहलगाम हल्ला हे इंटेलिजन्सचे अपयश- शरद पवार

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा इंटेलिजन्सचे फेल्युअर असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या सुरक्षा यंत्रणेतील कमतरतांवर चिंता व्यक्त केली.

पहलगाम हल्लाप्रकरणी शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद बोलवून पहिली प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने यासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जे निर्णय घेतले जातील त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल, पण सुरक्षा यंत्रणा आणि इंटेलिजन्समधील कमतरता सरकारने तातडीने दूर केल्या पाहिजेत, असे आवाहन शरद पवार यांनी केले. कश्मीरमधील दहशतवाद संपवला असे सरकारकडून सांगितले जात होते, पण पहलगाम हल्ल्याचा अर्थ अजून कुठे तरी कमतरता आहे, असे पवार म्हणाले.

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा हिंदुस्थानविरोधी होता. देशाविरोधात अशी कृती घडते तेव्हा सर्व देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवायचे असतात, असे शरद पवार म्हणाले.

 दहशतवाद संपलाय असा निष्कर्ष थोडा सावधपणेच काढा

दोन-तीन महिन्यांपूर्वीच आपण पहलगामला गेलो होतो. कश्मीरमधील इतर ठिकाणांपेक्षा पहलगाम अधिक सुरक्षित आहे. तिथेच दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे दहशतवादी प्रवृत्तींविरुद्ध देशाने यश मिळवलेय असा निष्कर्ष सरकारने थोडा सावधपणेच काढला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.