पाकिस्तानी भैया, माझा मित्र! अतिरेक्यासोबत बंगाली तरुणाच्या फोटोने खळबळ

Photo Credit : India Today

पहलगाम हल्ल्याबाबत देशभरातील अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच पोलीस प्रत्येक संशयित हालचालींवर लक्ष ठेवून आहे. यातच पश्चिम बंगालमध्ये एका तरुणाने संशयित अतिरेक्यासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे. राणा बिस्वास, असं या तरुणाचं नाव असल्याचं समजतंय. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी केलेल्या चौकशीत असं समोर आलं आहे की, हा तरुण तीन वर्षांपूर्वी कामासाठी कतारला गेला होता आणि अलीकडेच मुंबईत कामावर परतला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राणा बिस्वास नावाच्या या तरुणाने त्याच्या फेसबुक स्टोरीवर काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तो काही व्यक्तींसोबत दिसत आहे. ज्यांच्याकडे AK47 सारखी रायफल दिसते. या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया स्टोरीवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘पाकिस्तानी भैया’, ज्यामुळे पोलिसांना संशय आला. हे फोटो निदर्शनास आल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

शनिवारी कृष्णनगर कोतवाली पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राणा बिस्वासच्या फेसबुक प्रोफाइलची गांभीर्याने चौकशी केली जात आहे आणि त्याच्या पालकांचीही चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, राणा बिस्वासला तीन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणामुळे गावातून हाकलून लावण्यात आले होते. तो कामानिमित्त कतारला गेला होता आणि अलिकडेच परतला असून मुंबईतील एका नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये काम करत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.