जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी आणि त्यांना मदत पुरवणाऱ्यांच्या घरांवर छापे

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता हिंदुस्थानी सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांच्या आणि त्यांना मदत पुरवणाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. जम्मू-कश्मीर पोलीस ही कारवाई करत आहेत.

दरम्यान, नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने रात्रीतून गोळीबार केला, अशी माहिती हिंदुस्थानी सैन्याने रविवारी दिली. अलिकडच्या काळात सलग चौथ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील भागात गोळीबार सुरू केला.

हिंदुस्थानी सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार सुरू असल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध अशा बैसरन खोऱ्यात 26 जणांची हत्या करण्यात आली होती. कलम 370 रद्द केल्यानंतर कश्मीर खोऱ्यातील सर्वात भयानक हल्ल्यांपैकी एक म्हणून या हत्याकांडाकडे पाहिले जात आहे.