‘पढेंगे तो बढेंगे’, भाजपच्या बटेंगे तो कटेंगेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

”आज 21वे शतक सुरू आहे. “पढेंगे तो बढेंगे” ही घोषणा असायला हवी. मात्र राज्यकर्त्यांची घोषणा काय? तर बटेंगे तो कटेंगे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, ”सनातनी पद्धतीने वागून महाराष्ट्र मागे नेण्याचे काम काही अपप्रवृत्ती करत आहेत. खरं पाहिलं तर निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात येऊन अर्थार्जन करतो. त्यांना इथे सुरक्षित वाटते आणि योगी आदित्यनाथ इथे येऊन भडकवणाऱ्या घोषणा करत आहेत.”

ते म्हणाले, ”सर्वधर्म समभाव पाळतो. एकोप्याने राहण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळेच आमच्या कुठल्याच समाजाने यांच्या भडकाऊ भाषणांना भिक घातली नाही. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.”

याआधी बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, ”मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाण्याचा मोठा प्रश्न होता. मी जलसंपदा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन टीएमसी पाणी दिले. मंगळवेढ्यातील उर्वरित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची जबाबदारी देखील आम्ही घेऊ.”

देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत जयंत पाटील म्हणाले की, ”सोयाबीनला 6000 रुपये आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चे काढले होते. आज महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात असताना सोयाबीनला 3200 पेक्षा जास्त भाव मिळत नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सोयाबीनला कमीत कमी 7000 रुपये किंमत देण्याचे आम्ही ठरवलं आहे.”