कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI) चा वावर आता सर्वच क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे. एआयने आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी (प्राथमिक) परीक्षेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या या परीक्षेत एआयच्या पढाई (PadhAI) अॅपने बाजी मारली आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या एका टीमने हा पढाई अॅप नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी तयार केला होता. या अॅपने केवळ सात मिनिटांत संपूर्ण परीक्षेचा पेपर सोडवला आहे. या परीक्षेत पढाई अॅपने 200 पैकी 170 गुण मिळवले आहेत. या स्कोअरमुळे एआय ऑप्लिकेशनला राष्ट्रीय स्तरावर टॉप 10 स्कोअरर्समध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. हा स्कोअर कोणत्याही मानव किंवा एआय मॉडेलने आतापर्यंत केलेल्या स्कोअरपेक्षा सगळ्यात जास्त असणार आहे.
पढाईचे सीईओ कार्तिकेय मंगलम अॅपच्या कामगिरीबद्दल सांगताना म्हणाले की, ‘गेल्या दहा वर्षांतील यूपीएससी परीक्षेतील हे सर्वोच्च गुण आहे. कारण या परीक्षेत सरासरी 100 पेक्षा कमी गुणांचा सामान्य स्कोअर असतो. यूपीएससी’ची प्राथमिक परीक्षा झाल्यानंतर रविवारी या अॅपने शिक्षणक्षेत्रातील अधिकाऩयांच्या समोर पेपर सोडवून दाखवला आणि 200 पैकी 170 गुण मिळवले आहेत.ही एक उत्तम कामगिरी असल्याचे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘पढाई’ हे शैक्षणिक अॅप असून, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा वापर केला जातो. गूगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. यामध्ये एआय आधारित विविध सुविधा आहेत. त्यामध्ये बातम्यांचे सारांश, स्मार्ट पीवायक्यू सर्च, शंका निरसन, उत्तरांचे स्पष्टीकरण, पुस्तकांचे सारांश यांचा समावेश आहे.