लावलं भात उगवलं गवत; रायगडात बोगस बियाणांमुळे भात शेतीची माती

बोगस बियाणांमुळे रायगडात काही भागात भातशेतीची अक्षरशः माती झाली आहे. पालीच्या आपटवणे येथील शेकडो शेतकऱ्यांनी यावर्षी जया बियाणे पेरले होते. मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने लावलं भात आणि उगवलं गवत अशी भयंकर अवस्था शेतीची झाली असून भाताच्या लॉव्या पोकळ असल्याने केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे ऊन पावसात राब राब राबूनही हाती धतुरा येणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

भातपीक सध्या कापणीला आले असून नवरात्रोत्सव होताच शेतकरी कापणीच्या कामाला लागणार आहेत. मात्र आपटवणेसह काही भागातील भाताला केवळ पोकळ लोंब्या आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले होते. मात्र 90 टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे बोगस निघाले आहे.

कृषी सेवा केंद्राच्या बोगस बियांमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या केंद्राची चौकशी करावी तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

कृषी अधिकारी करतात काय?

दरवर्षी शेतकरी वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रातून भात बियाणे विकत घेतात. मात्र पालीतील कृषी केंद्रातून उघडपणे बोगस बियाणे विकले जात असताना कृषी अधिकारी काय करत होते असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गोरगरीब शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुधागड कृषी मित्र संघटनेचे पदाधिकारी शरद गोळे यांनी केली आहे.