सिंधू 22 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार

कालच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावून आनंद साजरा करणाऱ्या पी.व्ही. सिंधूने आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिलीय. हिंदुस्थानातील कोट्यवधी क्रीडाप्रेमींची आवडती बॅडमिंटनपटू असलेली सिंधू येत्या 22 डिसेंबरला हैदराबादस्थित उद्योगपती वेंकट दत्ता साईशी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांचा विवाहसोहळा उदयपूर येथील एका महालात राजेशाही थाटात पार पाडला जाणार असल्याची माहिती सिंधूच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

हिंदुस्थानसाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या सिंधूला या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलामीलाच पराभवाचा धक्का बसला होता. गेली अडीच वर्षे तिला एकाही स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते. अखेर दीर्घ अपयशानंतर कालच तिने आपल्या पराभवांची मालिका खंडित केली होती. 22 तारखेला लग्न झाल्यानंतर 24 डिसेंबरला हैदराबाद येथे स्वागत समारंभ पार पडेल. पुढील वर्ष सिंधूसाठी खूप महत्त्वाचे असल्यामुळे ती दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जानेवारी महिन्यात पुन्हा कोर्टवर परतणार आहे.