
मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा असलेले पु.ल. देशपांडे यांचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा 25वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीता देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष.
नव्या संचातील ‘सुंदर मी होणार’चा शुभारंभ पुलंच्या 25व्या स्मृतिदिनी म्हणजेच 12 जून 2025 या दिवशी पुण्यात आणि 13 ते 15 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे करणार आहेत. नाटकाची निर्मिती करण देसाई आणि आकाश भडसावळे यांची आहे. नाटकात आस्ताद काळे, श्रुजा प्रभुदेसाई, स्वानंदी टिकेकर असे दमदार कलावंत आहेत. सृजन देशपांडे, श्रुती पाटील, नीलेश दातार हे कलाकार सहाय्यक भूमिकांतून दिसणार आहेत.
‘‘पुलं आणि सुनीताबाई यांनी एकत्रित काम केलेले एकमेव नाटक म्हणजे सुंदर मी होणार. पुलंचा 25वा स्मृतिदिन आणि सुनीता देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर या नाटकाचे प्रयोग करून या दोघा ज्येष्ठ कलावंतांना मानवंदना द्यावी,’’ या उद्देशाने नाटकाची निर्मिती केल्याचे आकाश भडसावळे यांनी सांगितले.
‘सुंदर मी होणार’मध्ये ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारणारी स्वानंदी टिकेकर म्हणाली, “बेबीराजे नेमकी माझ्यासारखी वाटते. तिची स्वतःची मते आहेत. मी हे नाटक पाहिले होते, पण वाचले नव्हते. आणि आता पुलंच्या हातून लिहिलेल्या ओळी रंगमंचावर बोलता येणार आहेत ही कल्पनाच खूप पवित्र वाटते.’’