अविवाहित जोडप्यांना ‘ओयो’ हॉटेलात नो एण्ट्री; मॅरेज सर्टिफिकेट, आधारकार्ड दाखवून प्रवेश

ओयो ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी आहे. अनेकजण ओयोच्या माध्यमातून हॉटेलमध्ये रूम बुक करतात. रूम बुकिंगच्या नियमांत आता ओयो कंपनीने बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. केवळ विवाहित जोडपे, कुटुंबातील सदस्य यांनाच चेक इनची परवानगी मिळेल. त्यासाठी बुकिंगच्या वेळीच मॅरेज सर्टिफिकेट, आधारकार्ड आदी कागदपत्रे दाखवावी लागतील. उत्तर प्रदेशीतील मेरठ येथे हा नियम लागू झाला आहे. अविवाहित जोडप्यांना रूम दिल्या जात असल्याबद्दल काही तक्रारी आल्या होत्या. समाजात चुकीचा संदेश जात आहे. अन्य शहरांतील रहिवाशांनी ओयो हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना चेक-इनची परवानगी देऊ नये म्हणून याचिका दाखल केली होती. या सर्व प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर अविवाहित जोडप्यांना रूम न देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले.

कंपनीचे म्हणणे काय

यासंदर्भात ओयो कंपनीचे नॉर्थ रिजन हेड पावस शर्मा म्हणाले, ओयो लोकांना सुरक्षित हॉस्पिटॅलिटी देण्यास कटिबद्ध आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आम्ही सन्मान करतो. मात्र ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो, त्यांचे म्हणणे ऐकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही वेळोवेळी या धोरणाची आणि त्याच्या प्रभावाची समीक्षा करू.अन्य शहरांतही हा नियम हळूहळू लागू होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सना ब्लॅक लिस्ट केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.