भ्रष्ट महायुती सरकार उलथवून टाका – शरद पवार

आठ वर्षांपासून सूत्रे भाजपकडे आहेत. भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले आणि केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे भ्रष्ट महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिल्याने भाजपचा राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन आम्ही थांबवू शकलो, असेही पवार म्हणाले.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचे बुधवारी (दि. 13) आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पवार बोलत होते.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, पिंपरीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे,जयदेव गायकवाड सलाधार बाळो पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने चारशे पारचा नारा दिला. बहुमतासाठी चारशे जागांची आवश्यकता नसतानाही हा नारा दिला होता. कारण, राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशे खासदार हवे होते.

एकीकडे राज्य सरकार लाडकी बहिण योजना राबवत आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एका शाळेतील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झाले, या घटनेमुळे राज्याचे नाव खराब झाले, असेही शरद पवार यांनी ठणकावले.