अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर टीम इंडियाने मोहोर उमटवली. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 17 वर्षांनी टी-20 वर्ल्डकप जिंकला. याच स्पर्धेमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. सुपर-8मध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना बांगलादेश संघाविरुद्ध पार पडला. या लढतीला बांगलादेशचा उपकर्णधार तस्किन अहमद मुकला होता. आता तो या लढतीत नक्की का खेळू शकला नव्हता याचे कारण स्पष्ट झाले आहे.
सुपर-8मध्ये बांगलादेशचा कर्णधार टॉससाठी मैदानात आला तेव्हा त्याने अंतिम-11 खेळाडूंचा संघ जाहीर केला. संघात एक बदल करण्यात आल्याचेही त्याने सांगितले. उपकर्णधार आणि प्रमुख वेगवान गोलंदाज तस्किन अहमद याच्या जागी नवख्या जॅकर अली याचा संघात समावेश करण्यात आला होता. या बदलामुळे बांगलादेशचे चाहतेही चकीत झाले होते. तस्किम अहमद चांगला फॉर्मात होता आणि टीम इंडियाविरुद्ध तो मैदानात उतरेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र त्याला संघात का स्थान मिळाले नाही याचा आता खुलासा करण्यात आला आहे.
बांगलादेश आणि टीम इंडियात 22 जून रोजी सुपर-8चा सामना पार पडला. या लढतीसाठी बांगलादेशचा संघ सकाळीच मैदानाकडे रवाना झाला. बांगलादेशचे खेळाडू, इतर स्टाफ बसमध्ये बसले. मात्र उपकर्णधार तस्किन अहमद आला नव्हता. सर्व सहकारी त्याची वाट पाहत होते. त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो फोनलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा त्याला सोडून उर्वरित खेळाडूंसह मैदानाकडे रवाना झाले. त्यामुळे तस्किन हा सामना खेळू शकला नव्हता.
Rahul Dravid : बेरोजगार राहुल द्रविडला मिळणार रोजगार; IPL मधील 4 संघांमध्ये रस्सीखेच
याबाबत क्रिकट्रॅकर स्पोर्टस वेबसाईटनेही एक वृत्त दिले आहे. टीम इंडियाविरुद्ध लढतीपूर्वी झोपेची डुलकी घेणे तस्किनला महागात पडल्याचे यात म्हटले आहे. तस्किम अहमद झोपलेला होता आणि तो जोपर्यंत हॉटेल रुममधून खाली आला तोपर्यंत संघाची बस निघून गेली होती. यानंतर तो एकट्याने मैदानात पोहोचला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तस्किन अहमद याची बस चुकली हे खरे आहे. मात्र नंतर तो मैदानावर पोहोचला. परंतु तो का खेळला नाही हे फक्त प्रशिक्षकच सांगू शकतात. तसेच प्रशिक्षक किंवा खेळाडूंमध्ये मतभेद असते तर अफगाणिस्तानविरुद्धचाही सामना खेळू शकला नसता. तसेच तस्किनने वेळेवर उठू न शकल्याने खेळाडू आणि इतरांची माफीही मागितल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तस्किन अहमद हा बांगलादेशचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याने या स्पर्धेत 7 लढतीत 8 विकेट्स घेतल्या. मात्र बांगलादेशचा संघ सुपर-8मधूनच गारद झाला.
रो, तुझे खूप खूप आभार! प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली कृतज्ञता