धारावीची जमीन अदानीला देण्याच्या बदल्यात आमदार खरेदीचा सौदा झाला, राहुल गांधी यांची टीका

मोदी, शहा आणि भाजपला धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला द्यायची होती. त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चोरले. तुमच्या डोळय़ादेखत धारावीची जमीन देऊन आमदार खरेदीचा सौदा झाला, असा घणाघात  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. धारावीची जमीन घेता, मग कुलाब्याची का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील धारावीची जमीन उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी आपल्या अमरावती येथील सभेत बोलताना म्हणाले की, हे सरकार धारावीची जमीन घेते, पण कुलाब्याची का घेत नाही? कारण कुलाब्यात दलित, आदिवासी, ओबीसी व आदिवासी नव्हे तर श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे त्यांनी गरीबांच्या धारावीची निवड केली. मी भूसंपादन कायद्यावर भाष्य केले तेव्हा अदानी व अंबानींचे लोक माझ्या मागे लागले. माझी प्रतिमा मलिन करण्यात आली. मला बदनाम केले गेले. यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. धारावीची कोटय़वधी रुपयांची जमीन उद्योगपतींच्या घशात जात असेल तर तेवढेच पैसे गरीबांच्या खिशात गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.

इथे राहुल गांधी उभा आहे!

सरकार व उद्योगपतींना गरीबांची जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, जंगल पाहिजे. त्यांना तुमच्याकडील सर्व काही हवे आहे. देशात निवडक 25 अब्जाधीश आहेत. या सरकारने त्यांना 16 लाख कोटींचे कर्जमाफी दिली. आम्ही याउलट शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. अदानींना धारावीत एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यांना वाटते हे सहज शक्य होईल, पण असे होणार नाही. कारण इथे राहुल गांधी उभा आहे, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ करण्याचे संविधानात कुठे लिहिले आहे? संविधान हे शिवाजी महाराजांचे आहे. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी स्वत:चे बलिदान दिले असते, पण गरीबांच्या जमिनी जाऊ दिल्या नसत्या. गरीबांचे त्यांनी संरक्षण केले असते, असेही राहुल गांधी म्हणाले.