केरळमधील नीलेश्वरम मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा मोठा स्फोट; 150 भाविक होरपळले, 8 गंभीर

देशभरामध्ये दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. मात्र या सणाला केरळमध्ये गालबोट लागले आहे. केरळमधील कासारगोड येथे नीरेश्वरम मंदिराच्या उत्सवादरम्यान फटाक्यांचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 150 हून अधिक भाविक होरपळले असून 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

कासारगोड जिल्ह्यातील नीरेश्वरम मंदिरातील उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली. आतषबाजी सुरू असताना फटाक्यांना लागलेल्या आगीमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे 150हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कासारगोड, कन्नू आणि मंगळुरुतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, परवानगीशिवाय फटाक्यांची आतषबाजी करणे आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीच्या 8 सदस्यांविरुद्ध अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फटाक्यांची आतषबाजी करताना निष्काळपणा करण्यात आला. यामुळे फटाक्यांच्या साठ्याला आग लागल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.