घोटाळ्याचे ‘प्रताप’ करणारा आमदार हवा की स्वच्छ प्रतिमेचा भूमिपुत्र हवा? नरेश मणेरा यांचा घोडबंदर परिसरात जोरदार प्रचार

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात मशालीचा जोर वाढला आहे. ही निवडणूक आता भूमिपुत्रांनी हातात घेतली असल्याने मतदारसंघात मशालच पेटणार असल्याचा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केला. मतदारांनो तुम्हाला घोटाळ्याचे ‘प्रताप’ करणारा हवा की स्वच्छ प्रतिमेचा भूमिपुत्र हवा, असा सवाल करीत मणेरा यांनी घोडबंदर परिसर पिंजून काढला.

ठाण्याच्या घोडबंदर भागातील माजिवडा नाका येथून आज सकाळी 9 वाजता महाविकास आघाडीने प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर माजिवडा गाव, रुस्तमजी, लोढा पॅराडाईस, भवानीनगर, हायवे ब्रिज, छबिया पार्क, मोझेस कंपाऊंड, कापूरबावडी, नळपाडा, गांधीनगर, ओसवाल पार्क, मैत्री गार्डन, संत लॉन्स येथे जोरदार रॅली काढली. मतदारांनीही जागोजागी प्रचार रॅलीचे स्वागत केले. यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मिंधे गटाला घाम फुटू लागला

दोन दिवसांपूर्वी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी प्रचारात सहभाग घेत भूमिपुत्रांना एकजूट होण्याचे आवाहन केले असल्याने मिंधे गटाला घाम फुटू लागला आहे. या मतदारसंघात मिंधे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा असा सामना रंगला आहे. एकतर्फी होणारी निवडणूक आता तशी राहिली नसल्याचे सांगत येत्या 23 नोव्हेंबर रोजी गुलाल आपणच उधळणार असल्याचा विश्वास मणेरा यांनी व्यक्त केला.