महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून कर्जतमध्ये तर अक्षरशः कहर झाला आहे. कर्जत तालुक्याच्या अतिदुर्गम खांडस या गावातील 22 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केला. एवढेच नव्हे तर या अत्याचाराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला असून अत्याचार करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय ऐनकर असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेने संपूर्ण कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान अत्याचाराचे प्रकार थांबणार तरी केव्हा, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
कर्जतमधील अक्षय ऐनकर या तरुणाने पीडित मुलीसोबत सुरुवातीला प्रेमाचे नाटक केले. तुझे वय १८ वर्षे पूर्ण झाले की आपण लग्न करू असे आमिषही दाखवले होते. दरम्यान गेली दोन वर्षे पीडितेवर अत्याचार करण्यात आला. त्या मुलीला गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्या घरी कोणीही नसताना सुरुवातीला भेटण्यासाठी बोलवले होते. अक्षय शारीरिक संबंधासाठी पीडितेला धमकावत होता.
कठोर शिक्षा करा !
पीडितेसोबत बळजबरी करीत अक्षय याने सतत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अत्याचार केले. अत्याचार करत असताना मोबाईलमध्ये मुलीच्या नकळत व्हिडीओ रेकॉर्डदेखील केले होते. दरम्यान हाच व्हिडीओ आता अक्षय याने आपल्या मोबाईलमधून सोशल मीडियावर व्हायरल केला. मुलीच्या कुटुंबीयांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी अक्षयवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कला आहे.