
दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा जवळचा सहकारी आणि सध्या टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर शंतनु नायडूने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. ‘आमची पिढी भाग्यवान, आमच्याकडे फोनच नव्हता,’ असे सांगत त्याने बालपणीच्या आठवणीच्या वाटेवरची सफर व्हिडीओतून घडवली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत शंतनु अस्खलित मराठीत बोलतोय. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही, असा मुजोरपणा काही अमराठी लोक दाखवत असताना शंतनुने मराठीत बोलून सर्वांना जिंकले आहे. त्याच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
व्हिडीओमध्ये 32 वर्षीय शंतनु नायडू कॉर्पोरेट पोशाख परिधान करून ऑफिसला जाण्याची तयारी करताना दिसतोय. त्याचवेळी त्याच्या पिढीच्या निश्चिंत बालपणाच्या प्रवासाला आपल्याला घेऊन जातो. मराठीत संवाद साधताना शंतनु म्हणतो, बालपण कितीही चांगले असले तरी, आमच्या पिढीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे एकही फोन नव्हता. वेगवेगळ्या गल्लीबोळात धावण्यात, दबडा इस्पाईस, चोर-पोलीस आणि लपाछपी असे खेळ खेळण्यात आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टी जायच्या. कोणीतरी नेहमीच आईकडे एका मुलामुळे त्रास होत असल्याची तक्रार करायचा. तो मुलगा मीच होतो.’ शंतनुने बालपणीचे खेळ, कैऱ्या-जांभळं चोरणं, फुलपाखरांच्या मागे लागणं, सायकल शर्यत, घरच्यांचा ओरडा, दिवेलागणीला पुन्हा अभ्यास अशा अनेक गोष्टींना उजाळा दिलाय. त्याच्या पिढीतली मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ांचं जिवंत चित्र रेखाटलंय.
डिजिटल क्रीनशिवाय बालपण अनुभवल्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. ‘फोनमुळे बालपण उद्ध्वस्त झाले असते… आणि आता आपण मोठे झालो आहोत. आता मोठेपण उद्ध्वस्त होतंय. काय दिवस होते ते… किती मोठं भाग्य की आमच्याकडे फोनच नव्हत’ असे शंतनुने म्हटलंय.