सांगली जिल्हा बँकेची शेतकरी, संस्थांसाठी पुन्हा ओटीएस योजना, अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सलग तिसऱ्या वर्षी ओटीएस (एकरकमी कर्जफेड ) योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे. बँकेकडून थकबाकीदार शेतकरी व संस्थांसाठी ओटीएस योजना राबवली जाणार आहे. ही योजना राबविणारी जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक असल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात 225 कोटी नफ्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘जिल्हा बँकेने मागील काही वर्षांत गतीने आर्थिक प्रगती केली आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले असून बँक आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा ओटीएस योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी झाली. अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती तसेच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकले नाहीत. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकेने स्वतःच्या नफ्यातून ओटीएस योजना राबवली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. थकीत कर्जावरील व्याजाची सवलत दिल्याने बँकेची कर्जवसुली झाली.

चालूवर्षी पुन्हा योजना सुरू करणार आहे. थकबाकीदार शेतकरी व संस्थांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. मागील योजनेत सुधारणा करून नवी योजना आणली जाईल. बँकेच्या नफ्यातून थकबाकीदार शेतकरी, संस्थांना ओटीएस देणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे. बँकेच्या या योजनेची माहिती आता अन्य काही जिल्हा बँकांनी घेतली असून तेथेही ही योजना लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.