
इस्रायलने युद्धविराम तोडून पुन्हा एकदा आपले रंग दाखवत गाझावर हल्ले सुरू केले. अशातच इस्रायली स्थायिकांनी ‘ऑस्कर’ विजेत्या पॅलेस्टिनी दिग्दर्शकावर वेस्ट बँकमध्ये हल्ला केला. त्यानंतर इस्रायलच्या लष्कराने दिग्दर्शकाला ताब्यात घेतले आणि काही तासांनी सोडून दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जखमा आणि कपडे रक्ताने माखले होते. डॉक्युमेंटरी ‘नो अदर लँड’च्या सह-दिग्दर्शकापैकी एकाला जबर मारहाण झाली. चित्रपट निर्माते हमदान बल्लाल यांना मारहाणीनंतर लष्कराने ताब्यात घेतले असल्याचे त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी म्हटले होते.
ऑस्करमधून परतल्यापासून आमच्यावर दररोज हल्ले होत आहेत. आम्ही डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल ते बदला घेत असावेत असे वाटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, इस्रायली सैन्याने सांगितले की, आमच्या सैन्यावर दगडफेक केल्याचा संशय असलेल्या तीन पॅलेस्टिनींना ताब्यात घेतले.
गाझावर पुन्हा हल्ला, 23 ठार
इस्रायलच्या हल्ल्यात आज गाझा पट्टीतील किमान 23 लोक ठार झाल्याचे पॅलेस्टिनी डॉक्टरांनी सांगितले. दक्षिणेकडील खान युनिस शहराजवळील मानवी वस्तीवर झालेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. गेल्या आठवड्यात युद्धविराम तोडून पुन्हा एकदा इस्रायलने हल्ले सुरू केल्याने मृत आणि जखमींची संख्या झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती नासेर रुग्णालयाने दिली. इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूसाठी हमासला जबाबदार धरले असून हमासचे दहशतवादी दाट लोकवस्तीच्या भागात कार्यरत असल्याचा आरोप केला आहे.