
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवतरमणी उर्फ ओरी याच्याविरुद्ध कटरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच तो त्याच्या मित्रमंडळींसह माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. या दरम्यान कटरा येथील बेस कॅम्पमध्ये त्याच्यावर मद्यपान करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यपान केल्याच्या आरोपाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीसह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे’. यामध्ये एका रशियन नागरिकाचा समावेश आहे. कायद्यानुसार या धार्मिक पर्यंटनस्थळी मद्यपान आणि मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे.
कटरा येथील एका हाॅटेलमध्ये दारू पिण्याचा फोटो ओरी याने सोशल मीडीयावर टाकल्यानंतर, ओरी आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फोटो सोशल मीडीयावर गेल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एफआरआय अंतर्गत ओरी आणि इतरांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. तसेच, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ओरी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कटरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरी व्यतिरिक्त त्याच्यासोबत दर्शन सिंग, पार्थ रैना, हृतिक सिंग, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि रशियन नागरिक अनास्तासिला अर्जामास्किना आदी मद्यपान करताना आढळले होते.
सेलिब्रिटींचा जिगरी दोस्त म्हणून ओरी हा बाॅलीवूड वर्तुळात खूप प्रसिद्ध आहे. ओरी हा कायम त्याच्या इन्स्टाग्रामवरुन विविध फॅशन इव्हेंटस्चे तसेच इतर घडामोडींचे फोटो कायम टाकत असतो.