अनाथालये, बालगृहांमधील मुलांची वयोमर्यादा 21 वर्षे, ‘म्हाडा’ लॉटरीतही आरक्षण  

प्रातिनिधिक फोटो

अनाथालये व बालगृहांमध्ये राहणाऱ्या अनाथ मुलांची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 21 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार असून ‘म्हाडा’च्या सदनिकांमध्ये अनाथ मुलांसाठी राखीव आरक्षण ठेवण्याचा प्रस्तावदेखील सरकारकडून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

अनाथालयातून बाहेर पडलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाऊंडेशनतर्फे ‘तर्पण युवा पुरस्कारा’चे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार व तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक श्रीकांत भारतीय, वोक्हार्टचे कार्यकारी संचालक डॉ. हुजैफा खोरेकीवाला, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि इस्कॉनचे प्रवक्ते नित्यानंद चरणदास उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सनाथ वेलफेअर फाऊंडेशनच्या संस्थापिका गायत्री पाठक, स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने आणि संस्कार गतिमंद मुलींचे वसतिगृहच्या अध्यक्षा मंगल वाघ यांना ‘तर्पण युवा पुरस्कारा’ने गौरविले.

पुण्यात उभारणार ‘माहेरवाशीण सदन’

अनाथालये व बालगृहांतून बाहेर पडून लग्न झालेल्या अनाथ मुलींना त्यांचे हक्काचे माहेर असावे यासाठी पुण्याजवळ ‘माहेरवाशीण सदन’ उभारणार असल्याची घोषणा यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनी केली, तर अनाथ मुलांमधून आदर्श व्यक्ती घडविण्याचे काम तर्पण फाऊंडेशन करत असल्याचे गौरवोद्गार राम शिंदे काढले.