मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतिस्तंभाजवळील पार्टीच्या चौकशीचे आदेश

विसावा उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतिस्तंभाजवळ पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत.वैभवशाली मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे स्मारक नांदेडच्या माता गुजरीजी विसावा उद्यानात मोठ्या दिमाखाने उभे आहे. मात्र, याठिकाणी कुठलीही सुरक्षा किंवा गैरवर्तन करण्याबाबत मनपाची यंत्रणा नाही. 24 च्या रात्री या स्मृतिस्तंभाजवळ केक कापून पार्टी करण्यात आली. त्याठिकाणी दारूच्या बाटल्या, बिर्याणीच्या प्लेट, केकचे पडलेले तुकडे आदी साहित्य दिसून आले. दैनिक सामनाने आज याबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर मनपाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग यांना या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उद्यानात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी

उद्यान अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आता आजपासून विसावा उद्यानात कुठलेही खाद्यापदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. उद्यानात प्रवेश करतानाच तपासणी केली जाणार असून, खाद्यपदार्थ नेले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. वाढदिवसासारखे कुठलेही प्रकार या परिसरात होणार नाहीत, व त्या परिसरात डीजेही वाजवता येणार नाही. त्यामुळे असे प्रकार टाळता येतील, असे उद्यान निरीक्षकांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, आयुक्तांना याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत